आनंदाश्रू
आज फेसबुक वर एक कुत्रा कसा त्याच्या मालकाला भेटायला हॉस्पिटल मध्ये गेला याची कहाणी होती. मला एकदम ती भूतकाळात घेऊन गेली. माधववाडी दादर मध्ये लहानाचा मोठा झालो, चाळी होत्या सर्व, साधारण २००४-५ सालची गोष्ट असेल. आमच्या मजल्यावर एका भटक्या मांजरीने काही पिल्लांना जन्म दिला होता. त्यातील एक आमच्याच मजल्यावर राहिला. मजल्याच्या WC च्या पॅसेज मध्ये पडून असायचं. खूप लहान पिल्लू होतं म्हणून त्याच्यासाठी मी आणि माझा भाऊ दूध ठेवायचो आणि त्याच्यावरून आमच्या शेजाऱ्यांशी आमची भांडणं व्हायची. आम्हाला तो काही करू शकत नव्हता मग त्याने त्या पिल्लाला त्रास द्यायला सुरवात केली. पिल्लावर पाणी टाकणे, त्याच्या बसण्याच्या जागेवर पाणी टाकणे असे प्रकार चालू झाले. रोज सकाळी भांडण आणि त्या शेजाऱ्याला शिवीगाळ करून ऑफिस असा प्रकार चालू झाला. त्या पिल्लाच्या आईला कळत होतं आम्ही तिच्या पिल्लाची काळजी घेतोय, इतर कोणी जवळ आले तर ती फिस्करायची. मी एके दिवशी ऑफिस ला गेलो होतो आणि भाऊ पण बाहेर होता त्याचा फायदा घेऊन त्या शेजारच्या डुकराने त्या लहान पिल्लाला ढकलून दिलं, तिसऱ्या मजल्यावरून ते पिल्लू खाली पडलं, माझ्या बाबांनी ते बघितलं आणि पुन्हा जोरदार भांडण झालं. ते पिल्लू जिवंत होतं, सुदैवाने सलील लवकर घरी आला होता, त्याच्या मित्रांना घेऊन तो परळच्या प्राण्यांच्या हॉस्पिटल मध्ये गेला. त्या पिल्लाच्या मांडीला फ्रॅक्चर झालं होतं. त्याचे फ्रॅक्चर नीट होई पर्यंत तिथेच ठेवायला लागणार होते. शेजारच्या माणसाची कम्प्लेंट देखील नोंदवली. त्या हॉस्पिटल कडून एक निळ्या हवालदाराच्या ड्रेस सारखा पोशाख केलेला माणूस आमच्या मजल्यावर आला आणि त्या शेजाऱ्याला जबरदस्त दम देऊन गेला. संध्याकाळी आल्यावर मला प्रकार कळला, सलील म्हणाला त्या माणसाला दम दिलाय चांगला. थोड्यावेळानी त्या पिल्लाच्या आईचा आवाज ऐकू यायला लागला, तिचं पिल्लू तिला दिसत नव्हतं, आमच्या दाराशी येऊन खूप वेगळ्या आवाजात रडायला लागली होती. तिचं रडणं ऐकवत नव्हतं. तिचं रडणं ऐकून आमच्या सगळ्यांच्या डोळ्यात पाणी आलं होतं. शेवटी आई त्या मांजरीला म्हणाली “त्याला हॉस्पिटल मध्ये ठेवलंय, रडू नकोस येईल तो” काय त्या मांजरीला कळलं माहित नाही पण तिचं रडणं खूप कमी झालं आणि त्या पॅसेज मध्ये जाऊन बसली. पुढचे दहा दिवस त्या मांजरीची अवस्था बघवत नव्हती. अकराव्या दिवशी ते पिल्लू बरं झालं म्हणून हॉस्पिटलच्या लोकांनी ते आमच्या बिल्डिंगमध्ये आणून सोडलं. ते पिल्लू थोडं लंगडत होतं खेळायला लागलं होतं खाली. ते हॉस्पिटल वाले म्हणाले कि ते तसं थोडंसं लंगडणार पण काळजीचं कारण नाही. आम्ही आमच्या कामाला लागलो. संध्याकाळी ती मांजर त्या पिल्लाला घेऊन आमच्या घरी आली. तिचं ते म्याव म्याव खूप वेगळं होतं जणूकाही ती आम्हाला सांगत होती “माझं पिल्लू परत आलं” अगदी हळुवारपणे म्याव म्याव करत होती पायाशी घुटमळत तिनी वर बघितलं तिच्या डोळ्यात पाण्याच्या रूपात आनंद होता. ते डोळे कधीच विसरता येणार नाहीत.
स्वप्नील सुनील गुप्ते
Comments
Post a Comment