तो



लहानपणी शाळेत शिकवलं होतं, पुस्तकं आपले चांगले मित्र असतात, ग्रंथ गुरु असतात आणि बरेचवेळा गुरूंपर्यन्त पोचायला हे मित्रच मदत करतात. काही मित्र लहानपणीच भेटतात आणि काही उशिरा भर उमेदीच्या काळात तर काही सूर्यास्त दिसायला लागल्यावर. पण हे मित्र अगदी पक्के साथ देणारे असतात कितीही संकट आली तरी साथ सोडत नाहीत आणि खूप काही शिकवून जातात, स्वतः जीर्ण होतात पण आपलं आयुष्य उजळून जातात
लहान असताना दोन मित्र मिळाले छावा आणि मृत्युंजय नावाचे, अगदी भरभरून दिलं त्यांनी. आत्मविश्वास, संस्कार, जिद्द, तत्व, निष्ठा, आदर निर्भीडपणा, यादी खूप मोठी होईल. पण दोघे खूप भोळे होते. त्यावेळेस अजून एकजण मित्र व्हायचा राहिला, प्रथमदर्शनी नाही आवडला. आयुष्य पुढे सरकत होतं यश मिळत होतं अडचणी निर्माण होत होत्या आणि पार देखील होत होत्या, मित्र पण होते बरोबर. छान चाललं होतं अगदी, पण मग अशी काही परिस्थिती आली आम्ही तिघे विचार करत होतो आता काय करायचं पुढे. हे दोघे म्हणाले आमचा एक मित्र आहे बघूया भेटतो का. आणि अचानक ध्यानीमनी नसता एका वळणावर तो दिसला. कुठेतरी पाहिलंय असं वाटत होतं, तो मात्र अगदी ओळखीचं हसला. मग आठवलं हाच तो, जो भेटला होता लहानपणी, पण अजून खूप यंग वाटत होता. मला म्हणाला "केस पिकले रे तुझे", आणि माझे खांदे त्याच्या मजबूत हातानी धरून माझ्या डोळ्यात बघत होता. एक विलक्षण सामर्थ्य होतं त्याच्या डोळ्यात, पुन्हा एकदा आश्वासक हसला, खूप वर्षांची ओळख असल्यासारखा. नंतर आपले हात पसरून म्हणाला "ओळखलं नाहीस का", मी देखील ओढल्यासारखा त्याला आलिंगन दिलं आणि पाठीवर त्याचा मायेचा हात फिरला आणि कानात शब्द पडले, "होईल सगळं व्यवस्थित". डोळ्यात अश्रू तरळले, ते बघून तो म्हणाला, चल माझ्याबरोबर. आणि माझ्या खांद्यावर हात टाकून माझ्याबरोबर चालू लागला. माझ्यापेक्षा अंगाने लहान होता तरी कसा खांद्यावर हात ठेऊ शकला म्हणून त्याच्याकडे बघितलं, तो तसाच होता. त्याने पुन्हा माझ्याकडे बघितलं, एक प्रसन्न हास्य मुखावर होतं त्याच्या, माझ्या खांद्यावर थोपटलं आणि मानेनेच इशारा केला चल म्हणून. त्याच्या खांद्यावरच्या हाताच्या पकडीत एक विलक्षण आश्वासकता होती. मनात विचार आला अरे हा आधी भेटायला हवा होता. तो एखाद्या मनकवड्यासारखा म्हणाला, "अरे मी तर तुझ्याबरोबरच होतो तू फक्त हाक मारायची वाट बघत होतो". सगळं अतर्क्य होतं, तो म्हणाला, "चालत रहा, काही सांगायचंय तुला आणि अजून कोणाशी तरी तुझी भेट करून द्यायचेय". मी मागे बघितले माझे दोघे मित्रही होते, हा परत म्हणाला "मित्र शोभताय तिघेही, वादळात नुसतं ताठ राहून नाही चालत, कधी कधी परत उभं राहण्यासाठी झुकावं देखील लागतं. चला लवकर." 
"तो" होता, नव्हे तो नेहमीच आहे आणि असणार आहे, असाच सगळ्यांना मार्ग दाखवणारा "युगंधर"...

Comments

  1. Wah, kya baat ! Uttam lihile aahes, keep it up. Be regular with your posts...Wish you all the best !

    ReplyDelete
    Replies
    1. सुरेख... स्वप्नील..असेच लिहीत रहा...

      Delete
    2. सुरेख... स्वप्नील..असेच लिहीत रहा...

      Delete
  2. Wa Swapnil... Masta lihile aahes.

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

आनंदाश्रू

एल्फिन्स्टन रोड दुर्घटना

गौरी लंकेश