जयंती आणि जन्मोत्सव
जयंती आणि जन्मोत्सव
सध्या एक फॅड निघालं आहे जुन्या शब्दांचे विपरीत अर्थ काढून नवीन शब्दांचा सोशल मीडिया वर उंदरासारखं सोडण्याचा.
जन्मोत्सव, हा एक नवीन प्रयोग, जशा गुढीपाडव्याच्या “शोभायात्रा” तसाच हा जन्मोत्सव. आणि हा शोध लावणारे सोयीस्कर रित्या तिथ्या विसरतात. नुकताच गुढीपाडव्याचा आणि संभाजी महाराजांच्या बलिदानाचा संबंधशोध लावणाऱ्यांनीच जन्मोत्सवाच्या शोधाचे अकलेचे तारे तोडले आहेत. तारे तोडले म्हटले अशासाठी कारण तिथीप्रमाणे आज छत्रपतींची पुण्यतिथी.
जयंती म्हणजे जन्मदिवस ही एक सोपी व्याख्या आहे मग देवांचे, साधू संतांचे, अवतारी व्यक्तींचे असे भेदभाव कशासाठी. जयंती म्हटल्यावर त्याचा उत्सव होऊ शकत नाही ? मग शिवजयंती काय आहे, दत्तजयंती (गुरुपौर्णिमा म्हणजे दत्तजयंती नाही) गणेश जयंती (माघी), नृसिंह जयंती, गुरु नानक जयंती, हे जन्मदिवस उत्सव स्वरूप नाहीत ?
थोडक्यात हनुमान जयंती चुकीचे आणि हनुमान जन्मोत्सव बरोबर हा प्रकारच चुकीचा आहे. सावरकर जयंती ला त्यांच्या विचारांचा उत्सव नाही होऊ शकत ?
आणि बरं हे जन्मोत्सव वाले नक्की काय साजरे करतात, पहाटे मारुती जन्म, मग सुंठवडा त्यानंतर सत्यनारायण महापूजा (कारण आज चैत्री पौर्णिमा) त्याच्यानंतर लाऊड स्पीकर वरून गाणी आणि मग भंडाऱ्याचे जेवण हे सगळं इतरांकडून गोळा केलेल्या वर्गणीतून (जयंती वाले सुद्धा यापेक्षा काही वेगळं करत असावेत असं वाटत नाही)
आपल्याकडे बहुतेक उत्सवांचे स्वरूप सर्वसाधारण असेच असते, मूळ मुद्द्यापासून किंवा संकल्पने पासून फारकत घेतलेले. नुसतं जन्मोत्सव म्हणून काही होणार नाही.
बुद्धी, शक्ती आणि निष्ठेची ही देवता या गुणांची आपल्याकडून तशीच उपासना घडो ही मारुती रायाच्याच चरणी प्रार्थना.
स्वप्नील सुनील गुप्ते
Comments
Post a Comment