कृष्णजन्माष्टमी

एका अद्भुत, अगम्य, नात्यांपेक्षा कर्तव्य आणि कर्म यांना महत्व देणाऱ्या, एका तत्ववेत्त्याचा, एका युद्धकुशल सेनापतीचा, स्त्रीत्वाचा सन्मान राखणाऱ्या पुरुषाचा, प्रेमाची नवीन व्याख्या घडवणाऱ्या, मनुष्यरूपात जन्म घेऊन भगवानपदी पोहोचणाऱ्या, गीतोपदेश करून अज्ञानकाजळी मिटवणाऱ्या युगंधराचा जन्म

पण आपण मात्र कृष्ण म्हटल्यावर बासरी, गोपिका आणि राधा यातच त्याला गुरफटवून टाकतो. त्याच्या पराक्रमांकडे केवळ चमत्कार म्हणून बघतो. जरासंधाबरोबरच्या युद्धात माघार घेतली म्हणून त्याला रणछोडदास म्हणतो पण तो पळण्याचा निर्णय घेणारा स्ट्रॅटेजिक थिंकर आपण विसरतो. पर्वतासारख्या मोठ्या संकटाचा लीलया बिमोड करतो पण आपण त्याच्या प्रगल्भ बुद्धिमत्तेकडे दुर्लक्ष करून फक्त अलंकारिक चमत्कारालाच लक्षात ठेवतो

 कृष्णचरित्राचा खरा प्रभाव या कलियुगात फक्त एकाच व्यक्तीवर पडला आणि ती व्यक्ती म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज, बघा विचार करून आक्रमण, प्रतिकार, माघार, सुटका, माणसे जोडण्याची कला आणि मुख्य म्हणजे कर्म आणि कर्तव्याला दिलेले प्राधान्य

आज ही शोकांतिका आहे ज्या कृष्णाने जीवनाचं तत्वज्ञान स्वतः जगून दाखवलं त्याला आपण फक्त देव बनवून देवघरात अडकवून टाकलं

कृष्णाकडे सुदर्शन होतं, शिशुपालाला शिक्षा करायला त्यानी ते वापरलं पण महाभारताच्या धर्मयुद्धात सुदर्शन नाही फिरलं, कारण अधर्माविरुद्ध लढणं हे धर्माला कर्म मानण्यारांचं कर्तव्य आहे

आता कृष्ण असता तर ? तो आहे आणि राहणार आहे फक्त आपण त्याला बघितलं पाहिजे. त्याची पूजा करून, अभिषेक करून, सहस्रनामाचा गजर करून तो दिसणार नाही. त्याच्या चमत्काराची आपल्या डोळ्यावर चढलेली झापडं उघडून त्याच्याकडे बघितलं, त्यानी दाखवून दिलेल्या मार्गावरून चालायचा प्रामाणिक प्रयत्न केला तर तो केवळ पाठीशी उभा राहणार नाही तर आपल्या अंतःकरणात येऊन राहील आणि माझ्यामते ती खरी जन्माष्टमी असेल

श्रीकृष्णार्पणमस्तु 


स्वप्नील सुनील गुप्ते 

gupteswapnil@hotmail.com


Comments

Popular posts from this blog

आनंदाश्रू

एल्फिन्स्टन रोड दुर्घटना

गौरी लंकेश